Wednesday, August 13, 2025

why can't we be friends?

  अनपेक्षित भेटी होत राहतात. माणसं आपल्या आयुष्यात येत राहतात, जात राहतात, आणि काही आपल्याला नकळत आतून हलवून जातात. तशीच तीही भेटली. मी आधीच वैतागलेलो होतो — कारण आतापर्यंत जेवढी माणसं भेटलेली, त्यांच्यात संवादाचं गाठोडं असलं तरी विचारांचं वजन शून्य होतं. पण ती वेगळी होती.

आमच्या गप्पा कुठून सुरू व्हायच्या, कुठे संपायच्या काही पत्ता नसायचा — कधी साहित्य, कधी संगीत, कधी आयुष्याबद्दलचे निरर्थक पण खोल प्रश्न. ती फार बोलायची नाही, पण तिला गझल आवडायच्या — आणि मला सुद्धा. तिथूनच आमच्या बोलण्याला पहिला सूर लागला. गुलाम अलींपासून ते जगजीत सिंगपर्यंत आम्ही गझल ऐकत बसायचो, प्रत्येक ओळीतून अर्थ उकलायचो.

ते क्षण विशेष वाटायचे — कारण ते फक्त संगीत नव्हतं, तो दोन मनांमधला एक अनामिक पुल होता. हळूहळू नकळत माझ्या मनात काही आकर्षणाचे अंकुर फुटायला लागले. पण त्याला काही दिशा मिळाली नाही.आणि अचानक एके दिवशी संवादच थांबला. कदाचित अहंकार कारणीभूत असेल.

मानसशास्त्र सांगतं की आपला मेंदू ज्या व्यक्तीशी संवादातून ‘dopamine reward’ अनुभवतो, त्या व्यक्तीला गमावणं म्हणजे एक प्रकारचं emotional withdrawal असतं. आणि मग ती आठवण एक सवयीसारखी परत परत जागी होत राहते— जसं मला अजूनही, एकटा गझल ऐकताना, आमच्या गप्पांमध्ये हरवून जायला होतं. प्रेम नाही म्हणता येणार त्याला, पण ती निखळ मैत्री होती — जी कधी कधी प्रेमापेक्षा जास्त गहिरी असतं.

पण मग मला नेहमी प्रश्न पडतो — आपल्या समाजात पुरुष-स्त्री मैत्रीला नेहमी शंकेच्या नजरेने का पाहिलं जातं? संस्कृतीच्या कचेरीत तिला का उभं केलं जातं? जणू तिच्यावर एखादं लेबल लावल्याशिवाय तिला आस्तित्वच नाही. तत्त्वज्ञान सांगतं की Feelings are like visitors — त्या येतात, थोडा वेळ थांबतात, आणि मग निघून जातात. पण आपणच त्यांना कायमस्वरूपी मुक्काम द्यायचा आग्रह धरतो.

विचित्र म्हणजे, माझ्या अनेक खास मैत्रिणी लग्नानंतर जणू दुसऱ्या जगात निघून गेल्या — जणू मी त्यांच्या भूतकाळातलाच एक भाग होतो, वर्तमानातला नाही. हे खरंच सामाजिक नियमांचं बंधन आहे का, की आपल्या मनानेच आखलेली रेषा?

कदाचित, खरी समस्या ही नाही की Why can’t we be friends? — खरी समस्या ही आहे की आपणच कधी कधी ठरवून घेतो की कोणाला मित्र राहू द्यायचं आणि कोणाला भूतकाळात दफन करायचं…

आणि कदाचित उत्तर अजून कुठेतरी आहे — तिच्याकडे, माझ्याकडे… की दोघांच्याही न बोललेल्या शांततेत?

No comments:

Post a Comment

why can't we be friends?

  अनपेक्षित भेटी होत राहतात. माणसं आपल्या आयुष्यात येत राहतात, जात राहतात, आणि काही आपल्याला नकळत आतून हलवून जातात. तशीच तीही भेटली. मी आधीच...